|| जय जय राम कृष्ण हरी || गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा || यादव रामा जयजय माधवा रामा || गोविंदा रामा हो जयजय || गोपाळ रामा हो जय जय ||

वारी / उत्सव

सद्गुरू निंबराज महाराजांचा जन्मोत्सव

रामलिंग ( शिरूर) याठिकाणी मुरहरपंत व निराबाई या दाम्पत्याने कडक अनुष्ठान केले त्यावर प्रभू शंकर भगवानांनी दिलेल्या वराप्रमाणे अश्विन शुद्ध १५ शके १५२७ ला मध्यानी संतश्रेष्ठ निंबराज महाराजांचा उभय दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला. जन्मावेळी प्रभू शंकराचा अवतार म्हणून देवांनी पुषवृष्टी केली ईश्वर प्रसाद म्हणून शिरूर गावचे लोकांनी मोठया आनंदाने थाटाने साजरा केला. व बारावे दिवशी पालखीत घालून त्यांचे नाव " निंबराज " असे ठेवले.

असा हा जन्म सोहळा दरवर्षी अश्विन शुद्ध १५ ( पौर्णिमेस ) मोठ्या भक्तिभावाने महाराजांच्या जन्मस्थळी रामलिंग या गावी तसेच समाधीस्थळी देवदैठण येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. या दिवशी देवदैठण येथे महाराजांच्या समाधीला पहाटे लघुरुद्राभिषेक त्यानंतर प्रवचन किर्तन हरिपाठ, हरिभजन इत्यादी कार्यक्रम होतात.

सद्गुरू निंबराज महाराज पालखी सोहळा

सद्गुरू संतश्रेष्ठ निंबराज महाराजांची पालखीची परंपरा हि संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांचे इतकीच जुनी म्हणजेच जवळपास साडेतीनशे वर्ष जुनी आहे. आषाढी वारीसाठी सद्गुरू निंबराज महाराजांच्या पालखीचे जेष्ठ वद्य अष्टमीस देवदैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान होते.हा पालखी सोहळा ढवलगाव ,पिंप्री चौफुला , पोलिसवाडी, पेडगाव , जलालपूर , खेड , करपडी, नागोबाचे शेटफळ दहिगाव टेम्भूर्णी करकंब गुरसाळे इत्यादी मार्गे पंढरपूर येथे आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर येथे पोहोचते..तीन ते चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे मानाच्या काल्याचे किर्तन होऊन पालखी देवदैठणला परतीच्या प्रवासासाठी निघते.

सद्गुरू निंबराज महाराज पुण्यतिथी उत्सव (अखंड हरिनाम सप्ताह)

महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. पूर्वी दरवर्षी वद्य १४ महाशिवरात्रीपासून यात्रेस आरंभ होऊन पाच दिवस यात्रोत्सव चालत असे परंतु आता अलीकडच्या काळात माघ वद्य एकादशीला उत्सवाला सुरवात होते शिवरात्रीच्या रात्री सद्गुरुंच्या समाधीला आभिषेक होऊन मुख्य यात्रोत्सव सुरु होतो उत्सवाच्या काळात पारणे, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, हरिजागर, महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अमावसेला देवाच्या भांड्याचे पूजन व प्रसाद असतो शेवटी गावातील सोनाराच्या ओट्याजवळ काल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होते. अशा या भक्तिमय वातावरणात निंबराज महाराजांच्या सर्व वंशजासह ग्रामस्थ मोठ्या आनंदाने सहभागी होऊन हि भक्तिपरंपरा पुढे नेट आहेत.


फोटो