|| जय जय राम कृष्ण हरी || गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा || यादव रामा जयजय माधवा रामा || गोविंदा रामा हो जयजय || गोपाळ रामा हो जय जय ||

विशेष लक्षवेधी

showcase image

देवाचे भांडे

त्या काळी पेंढारांनी प्रचंड लुटालूट केली जाळपोळ केली त्यानंतर थोड्याच दिवसांनी महाराजांचा समाधी उत्सव आला होता या आगीत व लुटीत भांडी वस्र द्रव्य धान्य सर्व जळून गेली होती उत्सव आला तो केला पाहिजे असे मनाशी ठरवून रावजीबुवांनी पुणे येथे जाऊन भिक्षा मागून धान्य गोळा केले व माघारी आले धान्य तर मिळाले पण हे बनवायचे कशात हा प्रश्न आला पण सर्व पांडुरंगावर सोडून रावजीबुवांनी उत्सवाची तयारी सुरु केली.

शिवरात्रीचा दिवस आला वहिवाटाप्रमाणे उत्सवाला सुरवात झाली यात्रेकरू जमू लागले संत भक्तमंडळी आली दुसरे दिवशी दर सालापेक्षा अधिक यात्रा जमली अन्नही अपुरे व ते शिजवण्यास पात्र नाही आता कसे होईल या काळजीत महाराज होते तोच भक्तांचा सहकारी भगवान डोक्यावर भांडे घेऊन दरवाज्यापाशी आले.

दरवाजे देवडीत संत्री पहारा होता त्यास म्हणतात हे भांडे पंढरपुरावरून आणले आहे तेथे विठ्ठल सावकार आहे त्याने उस्तवाकरिता पाठविले आहे यात भात शिजवावा त्याप्रमाणे केले असता भात काढून पंगत वाढण्यास सुरवात केली हजारो माणसे जेवणास बसली आहेत भात वाढीत आहेत देवाचे भांड्यातील भात वरचेवर उकरून वाढावा पाहावे तो भात कायम आहे.दुसरे भांडे घेण्याचा मुळी कारणच आले नाही या गोष्टीला शेकडो वर्ष झाले.

आजही निंबराज महारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी याच देवाच्या भांड्यात भात शिजवून या भांड्याची पूजा करून वाढला जातो आजही कित्येक लोक जेवणरुपी प्रसाद घेऊन जातात अशा या देवाच्या भांड्याची परंपरा व चमत्कार आजही आहे.


showcase image

पिवळी पताका

काही दिवस घरी राहिल्यावर संत निंबराज महाराजांना पुन्हा यात्रेस जावे असे वाटू लागले शरीर साथ देत नसल्याने कावडीसह कसे जावे हा विचार मनात घोळत असतानाच प्रभू विश्वेश्वराच्या दृष्टांतानुसार पंढरीला जाण्याची रुमाल लागली मार्ग माहित नसल्याने कोणासोबत जावे हा विचार चालू असतानाच समोर अनेक वारकरी दिसले त्यांचा तो उत्साह पाहून त्यांच्यात मिसळून जावे असे महाराजांना वाटत होते पण जावे कसे आपल्याया यात घेतो कोण मी परक्यासारखा झालो आहे हा धिक्कार मानून घेत मजल दरमजल करत सर्व गुरसाळ्यापर्यंत आले.त्याठिकाणाहून पंढरीच्या विठोबाचा कळस दिसल्यानंतर सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.भजन आरती आणि इतकं भावनाप्रधान वातावरण पाहून निंबराज महाराजांचे देहभान नष्ट झाले व पंढरीच्या पांडुरंगाच्या कळसाकडे पाहून निंबराज महाराजांनी मोठ्याने विठ्ठलाच्या नवे टाहो फोडला भक्ताचा कनवाळू वत्सरुपी निंबराज महाराज हंबरताच श्री पांडुरंग माऊली पान्हावली व वत्स निंबराज यांचा हेतू पूर्ण करण्यास करण्यास तयार झाली.विप्रवेष धारण करून निंबराज महाराजांजवळ येऊन कडाडून भेटली व हातात असलेली पिवळी पताका हाती दिली व आता तू वारकरी झालास ना परका राहिला नाहीस आजपासून आषाढी कार्तिकीची वारी करत राहा अशी आज्ञा केली अशा प्रकारे सद्गुरू निंबराज महाराजांना प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाने पिवळ्या पताकांचा प्रसाद दिला हि पिवळ्या पताकाची परंपरा आजही चालू आहे.


showcase image

उघड्याने किर्तनाची परंपरा

निंबराज महाराजांना भगवान पांडुरंगाने गुरसाळे येथे येऊन प्रत्यक्ष पिवळी पताका दिली त्याच दिवशी पिवळी वीणा धरावी म्हणून चिन्ह दाखविले पुन्हा एकदा चंद्रभागेवर ब्राम्हण वेषाने येऊन मेसळा टोपी दिली तीही पिवळीच दिली म्हणून पीतवसन परिधान करण्याची वहिवाट संप्रदायात चालू झाला तसेच एकदा सदगुरु निंबराज महारांचे किर्तन चालू असताना प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा निंबराज महारांच्या स्कंदावर येऊन वारा घालू लागले.

किर्तन करिता देव खांद्यावरी !!
मोर कुंच शिरी ढलितसे !!

हे एका सावकार श्री ने पहिले तदनंतर सर्वाना याची अनुभूती मिळाली.

उभे राहावे कीर्तनी उघडे ! पागुटे नसावे आंगडे !!
कास घालो निवाडे कोडे ! गावे पवाडे श्री हरीचे !!
ती आज्ञा शिरी वाहुनी ! संप्रदायाची करिती किर्तन !!
सप्तपिढी वरदान ! निंबराज पावन झालेसे !!

ज्या दिवशी पितांबर प्रसाद झाला त्या दिवसापासून पिवळे वस्र व उघड्याने किर्तन करण्याची चाल पडली आहे. ती आजही निंबराज महाराजांचे वंशज पाळतात.


showcase image

पंढरपूर येथे आषाढी यात्रेवेळी गोपाळपूर येथे काल्याचा मान

सावळे बालरूप हातात मोरकुंचे घेऊन निंबराज महाराजांच्या स्कंदावर ढाळीत असलेले सर्वांच्या दृष्टीत पडल्यानंतर देहभान हरपून सर्वानी पुष्पवृष्टी केली.जिकडेतिकडे आनंदी आनंद झाला. अशा या आनंदोत्सवात पांडुरंगरायानी सर्व संतास आज्ञा केली गोपाळकाला निंबराज महाराजांचेच हातून करवीत जावा. तो मान आजपासून निंबराज महाराजांना दिला आहे तुम्ही या काल्याच्या समारंभास साहाय्य करावे अशी सर्व संतांना आज्ञा झाली.

याचे आषाढी कार्तिकीला ! वेणूनाद करावा काला !!
लाह्या कवळवाटी सकला ! मान तुजला तेथीचा !!

याप्रमाणे आज्ञा झाल्यानंतर मंगलारती करून सर्व संत आपापल्या स्थळी गेले. त्याच रात्री बडव्यास आज्ञा झाली.

पौर्णिमेचा सोहळा ! वेणूनादि असे आगळा !!

तो निंबराज मान दिधला ! कारविजे काला त्या हाती !!

हांडी लाही त्या करीची ! मग गोड लागे या संतांची !!
ऐशी आज्ञा होता साची ! करिती निंबयाची प्रार्थना !!
गोपाळ कालियाचा विठ्ठल दे मान निंबराजास !!!

पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्व मंडळी एकत्र जमून निंबराज महाराजांकडे आली व गोपाळकाला करण्याकरिता आपण चला असे सांगितले कारण तुमचे हातून लाह्यांचा घास घेण्याची प्रत्यक्ष पांडुरंगरायाची ईच्या आहे व तशी सर्व संतास व बडव्यास आज्ञा झाली आहे.म्हणून आम्हालाही आपलेच हातून प्रसाद मिळाला पाहिजे. आता तुम्ही आमचे राजे आहात प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मयानेच आपल्यावर मोरकूंच वाटले हे राजचिन्ह आहे म्हणून आम्हीही आपणास " निंब " या नावापुढे " राज " हि पदवी आम्ही पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला देतो. असे म्हणून सर्व जण भजन टाळ पताका विना घेऊन भजन करीत गोपाळपुरला पोहोचले.

गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा !!
यादव रामा जयजय माधवा रामा !!
गोविंदा रामा हो जयजय !!
गोपाळ रामा हो जय जय !!!!!

वरीलप्रमाणे भजन करण्याचा प्रघात संप्रदाय चालत आला आहे.

निंबराज महाराजांनी गोपाळपूर येथे सर्व संतमंडळींसह गोपाळकाल्यास प्रारंभ केला व विविध खेळ करून गोपाळ काल्याचा प्रसाद निंबराज महाराजांच्या हेतू प्रत्यक्ष पांडुरंग परमात्यानी खाल्ला आणि इतरांनीही तो प्रसाद ग्रहण करून सर्व जण परतले.

अशा प्रकारे प्रत्यक्ष पंढरीनाथ भगवंताचा प्रसाद म्हणून गोपाळपूर येथे काला करण्याचा दिलेला मान ती परंपरा आजही चालू आहे.आजही सद्गुरू निंबराज महाराजांच्या पालखीचे आगमन होऊन निंबराज महाराजांच्या वंशजांचे काल्याचे कीर्तन गोपाळपुरला मंदिराच्या पायथ्याशी झाल्याशिवाय संपूर्ण आषाढी उत्सवाची सांगता होत नाही.