गणपती आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची। कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चन्दनाची उटि कुंकुमकेशरा। हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना। सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवन्दना॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परन्तु न बोलवे काही। साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा। क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा। अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा। नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

नृसिंहाची आरती

कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन। अवनी होत आहे कंपायमान। तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण। उग्ररूपें प्रगटे सिंहवदन।। १ ।।

जय देव जय देव जय नरहरिराया। आरती ओवाळू महाराजवर्या। जय देव जय देव ।। एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी। ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी। चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं। कैलासीं शंकर दचके मानसीं।। २ ।।

जय देव जय देव जय नरहरिराया। आरती ओवाळू महाराजवर्या। जय देव जय देव ।। थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित। तीक्ष्ण नखांनीं दैत्य तो विदारीत। अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित। माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। ३ ।।

जय देव जय देव जय नरहरिराया। आरती ओवाळू महाराजवर्या।

पांडुरंगाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं। कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा। सुवर्णाची कमळे वनमाळा गळां। राही रखुमाबाई राणीया सकळा। ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती। चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती। दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णावा किती॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती। दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा। वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा। लावण्य सुन्दर मस्तकी बाळा। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें। त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले। ते त्वां असुरपणे प्राशन केलें। नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

खंडोबाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥ मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥

सुरवरसंवर वर दे मजलामी देवा । नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥ अघटित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला । तो हा मल्लांतक अवतार झाला ॥ यालागीं आवडे भाव वर्णीला । रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा। नेती नेती शब्द न ये अनुमाना। सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त। अभाग्यासी कैसी न कळे ही मात। पराही परतली तेथे कैचा हेत। जन्ममरणाचा पुरलासे अन्त॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

दत्त येऊनियां ऊभा ठाकला। सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला। प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला। जन्ममरणाचा फेरा चुकविला॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हरपलें मन झालें उन्मन। मी तू पणाची झाली बोळवण। एका जनार्दनी श्रीदत्तध्यान॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळीतां हरली भवचिन्ता॥

एकनाथ महाराजांची आरती

आरती एकनाथा | महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा ॥ धृ. ॥
एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ ||

एकनाथ नाम घेतां | सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां | आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||

ज्ञानोबारायांची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो || साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

संत तुकाराम महाराजांची आरती (आरती तुकारामा)

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें | म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||

श्री संतश्रेष्ठ सद्गुरू निंबराज महाराज आरती

आरती निंबराजा | जयसिद्ध सहजा || मी तू पण मावळले | ब्रह्म देखणे वोजा ||१ ||

स्वरूपी भेद नाही | स्थूल सूक्ष्म पाही || यापरी विचरतो | सर्व देखणे ओजा || २ ||

निर्गुण रूप आहे | सगुणरूप काजा || येवोनि लवलाहे | भक्त तारिले ओजा ||३||

श्री नारायण महाराज आरती

श्री संत निंबराज महाराजांचे चिरंजीव आरती नारायणा । निंबराज नंदना आरती ओवाळीन । तुम्हा करुणा घना ॥ध्रु॥
आनुताप पातकरी । माजी वैराग्य वाती ॥ स्वात्म बोध ओवाळीन । शुद्ध वासना ज्योती ॥१॥

नारायण नाम सार । वेद अक्षरे चार ॥ पाहता जणी वणी । महा मंत्राचे बीज ॥२॥

काय वाचा मने सहित । ऐसी आरती झाली ॥ निंबराज नारायणा । दिना लागीन कृपा केली ॥३॥

श्री दादा स्वामी महाराज

जयदेव जयदेव जय दादा स्वामी । आरती ओवाळु तव पाद पदस्पक्ष्मी ॥ध्रु॥
लीला विग्रही स्वरूप वर्तले कोण । अपार महिमा जाण अवतार पूर्ण ॥१॥

त्वं पद तत्पद असिपद कोठून । अभय असता वास सातोय पूर्ण ॥ सगुण वेने तुवा जवळ दाखविले । जणी वाणी तुवा शोभा आणिले ॥२॥

देखले देखत कैसे अज्ञान झाले । सन्निध असता तेव्हा नाही ओवाळिले । विरोध संवत्सरी फाल्गुन मासी । अमावस्या तिथी चंद्रवारसी । करोनि प्रयाण अभय देहासी । अज्ञान आरती चरणासी ॥३॥

श्री नारायण महाराजांची आरती

(दादा स्वामींचा मुलगा)

जयदेव जयदेव जय नारायणा आरती ओवाळू तुझिया चरणा ॥ध्रु॥
ब्राम्हण सेवा नित्य केलीसे बहुत । पांडुरंग चरणी लाविला हेत । सर्वाभूती दया अंतःकरणात । अहंकाराचा लेश नाही चित्तात ॥१॥

सत्व स्वरूपी पाहता विठ्ठल मूर्ती । अशादिक लक्षण अंगी दिसती । तेणे करुनि जैसा माध्यान्ह गभस्ती । त्रिभुवन माझारी विख्यात किर्ती ॥२॥

संवत्सराचे नाव अति साधारण । जेष्ठ मासी शुक्ल पौर्णिमा पूर्ण । पांडुरंग चरणी अर्पिला प्राण । दास आरती करिती त्याचे चरण ॥३॥

श्री मनोहर महाराज आरती

रावजीबुवांचा खापर पणतू सचिदानंद वृत्ती तुझीन मूर्ती । कीर्तने तो राहे आनंद स्थिती । ब्रह्मरूप पाहे सर्वत्र जगती । पांडुरंग चरणी अखंड प्रीती ॥१॥

जयदेव जयदेव जय मनोहर सद्गुरू करी मख नाशक भाव सिंधू तारू ॥ध्रु॥

द्वापारात जेवी कृष्ण अवतार । तैसेचि येथे दावी प्रकार । शांती क्षमा तया वसे निरंतर । पुंडलिक रूपे दावी अवतार ॥२॥

पार्थिव संवत्सरी वैशाख मासी । सतराशे सत्तेचाळीस शुक्ल पौर्णिमेसी । महाकालेश्वरी अर्पी प्राणास । आरती आत्मज करी चरणासी ॥३॥

आरती घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव । त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात । करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने|

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय |

महाराजाय नम: ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

आरती संग्रह